Wednesday, November 18, 2009

माझे पहिले वहिले प्रेम



"ताई, कृपा कुठे आहे? ह्या मुलांमधे दिसत नाहीये".. असंख्य चिल्ल्यापिल्ल्यांमधे माझे बाबा मला शोधत होते. पण मी तिथे सापडण शक्यच नव्हत. शेवटी माझ्या शाळेतल्या ताईंनी बाबांना हसत सांगितलं, "अहो, कृपा वर शाळेत येतचं नाही. ती खालीच फूलं गोळा करत बसलेली असते. तिच्या एकटी साठी आमच्यापैकी एकीला खाली थांबाव लागत. सगळ समजावून सांगितलं, पण तिला खालीच बसायचं असतं. दिवसभर घसरगुंडी खेळायची आणि बुचाची फूले गोळा करायची ह्या शिवाय ती इथे येऊन वेगळ काहिही करत नाही." आता ह्यावर बिचारे माझे बाबा काय म्हणणार. मला शोधत मग ते खाली आले. माझ्या मागे माझे बाबा येऊन उभे राहिले आहेत हे मला कळलचं नाही. मी आपली मग्न होते माझी लाडकी बुचाची फुले वेचण्यात. राधेनं-मीरेनं बालपणापासून जस निस्सिम प्रेम केल कृष्णावर तसच माझ सुध्दा प्रेम जडलं होतं त्या बुचाच्या फुलांवर. वारयानं फूल खाली पडलं  कि पळत जाऊन ते उचलायचे. एवढ काय ते मी त्या शाळेत करायचे... आणि म्हणूनच बुचाचे मोठे झाड असलेली माझी ती कर्वेंची शीशु-गटाची शाळा तेव्हा पासून माझी "बुचाची-शाळा" बनली. नंतर शाळा बदलली पण बुचाच्या फुलांवरच माझे पहिले वहिले मात्र तसेच राहिले.


      आपल्यातल्या प्रत्येकाला एखादं फूल अगदी मनापासून आवडतं, पण माझी गोष्ट जरा वेगळीच होती. मी बुचाच्या फुलांनी जणू झपाटलेच होते. तशी पांढरया  रंगाची फुलं मला जास्त आवडतात. त्यात जाई, जुई, मोगरा, निशिगंध ह्यांसाठी मी वेडीच. पण बुचाचे फुल म्हणजे जरा-खूप-जास्त मनापासून आवडीचे. गुलाबीसर पांढरा रंग, किंचित वेलवेटी पिवळ्या रंगाची झाक, लांब दांडा आणि वेड लावेल असा सुगंध. ह्याचं झाड सुद्धा मस्त २०-२५ फूट उंच. आणि फुले यायचा season म्हणजे झाड मनसोक्त पावसात भिजलं कि लगेच. अगदी महिन्यांच्या भाषेत सांगायचं तर उशिरात-उशिरा सप्टेंबर मध्ये. जेवढा पावसाचा जोर जास्त तेवढाच फुलांचा सुगंध जास्त आणि तेवढाच झाडाखाली फुलांचा सडा-गालिचा मोठा. एक एक फुल अगदी टप्पोर दिसतं वेड लावणार.


    मराठी मधलं एक गाण आठवतय? "लपवलास जरी हिरवा चाफा; सुगंध त्याचा  छ्पेल का ?..." अगदी तसच गाण माझ्या ह्या फ़ुलावर कोणीतरी करावं  असाच त्याचा सुगंध.  कितीहि कोपरयात असू दे किंवा खूप झाडांच्या गर्दीत उभे असू दे हे झाड,  त्याच्या असंख्य फुलांनी तो त्याचे अस्तित्व टिकवून ठेवत असतो,  त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत ठेवत असतो. माझ्या सारख्या वासाडी ला तर लगेच त्याच हे अस्तित्व जाणवतं. आणि मग लगेच माझी नजर इकडे तिकडे भिरभिरायला लागते. त्याला शोधायला लागते. पहिले प्रेमच ते माझे. मनापासून ऒढ हि लागणारच नं.



   बुचाची फुलं गोळा करणे म्हणजे दिवाळीच्या सुट्टी मधला अगदी ठरलेला  program.. भान हरपून जायचे अगदी ती वेचताना. पुण्यामधे माझ्या आत्याचे घर  पुणे विद्यापिठाजवळ असल्यामुळे तिथे जाताना Law college रोड वरून ये-जा व्हायची. मुळात तो रस्ताच माझ्या लाडकीचा होता. कारण त्या रस्त्यावर एकमेकांना लागून अशी ४-५  बुचाची झाडं नुसते सडे घालायची पावसाळ्यात. खरतरं किती गर्दीचा रोड, पण तिथे थांबून फुलं गोळा केल्याशिवाय तिथून जायच नाही हे मनात ठरलेलच असायच माझं. आत्याकडे जायला वेळ लागला कि माझे भाऊ आत्याला सांगायचे, "अगं ती जरा महत्वाच्या कामात अडकली असेल (रस्त्यात फुल गोळा करत बसली असेल)".  माझं नक्की कोणतं महत्वाच काम होतं हे मग मी आत्याकडे गेल्यावर तिला आपसूकच कळायचे.


        माझ्या college मधल्या मैत्रीणी सुद्धा न विसरता माझ्यासाठी ही फुलं गोळा करुन आणायच्या. माझ हे प्रेम प्रकरण सगळीकडेच माहित झालं आणि त्यामुळे लवकरच माझ नाव "बुचवेडी कृपा" असं बनलं. पण तरिहि माझ प्रेम कमी झालं नाही. भांडण होवो अथवा रुसॊ, एक बुचाच फुल दिल कि "मामला खलास" हे माहित असल्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा उठवला होता. अशी असंख्य फुल घेत झालं गेलं विसरत मी सुद्धा आनंदात जगत होते. DCH मधला एक dialouge आहे नं, "केक खाने के लिये हम कही भी जा सकते है", अगदी त्याच पठडी मधल माझ वाक्य तयार होतं, "बुचाच्या फुलासाठी मी कुठेही जाऊ शकते". झपाटले होते त्याच्यासाठी हेच खरं.


      प्रत्येक मुलीच्या मनामध्ये so called एक "राजकुमार" असतो . तसा माझ्या मनात सुद्धा होता. फ़रक एवढाच होता, कि प्रत्येकीला गुलाबाच फुल देत तो आपल्याकडे येतोय असा भासायचं, पण मला मात्र माझ्या राजकुमारानं मला बुचाच फुलं देउन propose कराव अस वाटायचं. ह्या बुचवेडी  ला तसाच नवरा मिळावा अशी सुप्त इच्छा पण होती माझी. आणि म्हणूनच माझ्या लग्नासाठी असलेल्या असंख्य अटी मधली एक अट होती , "माझ्या होणारया नवरयाच्या घरासमोर बुचाच झाड असलच पाहिजे.".  एक दिवस सहज गप्पांमधे मी माझ हे स्वप्न चुकून मैत्रिंणींना सांगितलं  आणि झालं, त्यांना जणू उतचं आला मला पिळायचा..., "madam, तुमचा राजकुमार तुम्हालाच विचारेल हे बुचाच फुल म्हणजे काय हो बाई?".. शी.. किती वाईट वाटल होतं मला हे ऎकून. पण मी गप्प राहिले. मनाला समजावलं "अगं, तुझी आवड वेगळी असली म्हणून काय झालं, तो विचारेन न तुला हे कसल फुल आहे. अजून काय हवं मग?".  दिवसेंदिवस माझ हे प्रेम मात्र अजूनच बहरू लागले.


     जस जशी मोठी होत गेले तस-तसे बुचाच्या झाडाचे-फुलाचे वेग-वेगळे गुणधर्म समजायला लागले. एक झाड माणसाला जगण्याची सुरेख पद्धत दाखविते हे जेव्हा जाणवलं तेव्हा खरच छान वाटलं. बुचाची फुलं-कळ्या जो पर्यंत लहान असतात, त्या झाडावरच वरच्या दिशेने उभ्या उमलतात. पण पूर्ण उमललेली फुलं मात्र आपोआप जमिनीच्या दिशेला झुकतात. एखादं झुंबर दिसावं तशी डवरलेली असतात झाडाच्या टोकांवर . वारयाच्या एका अलगद झुळूकेनं सुद्धा टपकन खाली पडतात. जणू चांगल देण्याची वृत्ती अंगिकारा अस सुचवतं असावं हे झाड. उत्तम आहे ते दुसरयांना आनंदाने द्या, आणि जे आपल्याकडे आहे ते अजून चांगलं निस्वार्थी पणे बनवा. ह्या झाडाची फुल सुद्धा जरा अशीच वेगळी बर कां.  जमिनीवर पडून सुकली-कोमजली तरी पाण्यात ठेवताच पुन्हा एकदा तितकीच ताजीतवानी होतात आणि दरवळत रहातात. दुखा:तून बाहेर पडत थोड्याश्या प्रेमाने-आपुलकीने सुद्धा आयुष्य परत एकदा नव्या उमेदिनं  जगता येते ह्याची शिकवणच जणू हि फुलं देतात आपल्याला.


    पण काहिंच्या मते बुचाचे झाड दारी न लावणेच चांगले कारण काय तर त्याची मुळं खूप आडवी जमिनीमध्ये पसरतात. मी मात्र हे झाड माझ्या घरासमोर असाव ह्या साठी खूप धडपड केली.  collegeमधल्या मैत्रिणीकडून एक-दोनदा त्याची फांदी लावून बघितली, पण त्यात यश काही आलं नाही. आपली पुणे महानगर पालिका १० पैशांना बुचाची रोपं विकते हे कळल्यावर तर लगेच अशी ४-५ रोप मिळवली. आणि आमच्या society च्या बागेत लावली. पण आमच्या माळ्यानं मात्र चक्क ३-४ वेळ मी आणून लावलेली प्रत्येक  रोपं काढून टाकली. अर्थातच त्याच्याबरोबर माझी "खांदानी दुष्मनी" सुरु झाली. अखेर एक दिवस तो नाही हे बघून मी एक रोपटं जरा एका कोपरयात लावलं. माझ्या नशिबान त्याकडे त्या "खडूस" माळ्याच लक्ष गेलं नाही आणि त्याची वाढ सुरु झाली. आता तो जुना माळी सुद्धा बदलून गेल्याने मी निर्धास्त झाले. नविन आलेल्या माळ्याला मात्र ते झाड दाखवून "ह्याला नीट जप हं" अशी सक्त ताकिद दिली. पहिली पालवी, मग नविन नविन आलेली पानं, हिरव्या नाजूक देठाची झालेली फांदी आणि उंच उंच होत जाणरी त्याची वाढ, हे सगळं मी आनंदाने टिपतं होते ५-६ वर्षातच झाड मस्त १५-२० फूट वाढलं होतं. पण अजूनही काही त्याला फुलं आली नव्हती. पण मी सुद्धा आशा सोडणारयातली नव्हते. थांबायला तयार  होते.




 ह्याच दरम्यान माझं  College संपून job सुरु झाला, अजून मित्रपरिवार वाढला. प्रत्येकाला आपोआपच माझ्या वेडा बद्दल कळत गेलं. सगळे मित्र-मैत्रिणी मिळून गणपती बघायला गेलो कि मी मधेच चालता-चालता  बुचाची फुल पडलेली बघून पटकन वाकून २-३ फुलं गोळा करायचे. "हि मुलगी न अवघड आहे" असे शब्द कानावर यायचे पण "तुम्ही फुलांचा वास घ्या म्हणजे कळेल" अस म्हणत सगळ्यांच्या पुढे जाऊन थांबायचे. असेच एकदा आम्ही २-३ जणं "Anacondas: The Hunt for the Blood Orchid" बघायला गेलो होतो. Movie  बघून बाहेर आल्यावर एका मित्राने ऎकवलं, "काय समजलं हा picture बघून? कुठेही कधिही दिसलं बुचाचं झाड कि जातेस पळत. चिख्खल असू दे किंवा पाणी. तिथे साप, नाग, anaconda काहिही असू शकतं. कळलं? वेडपट...". आता हे ऎकून नुकताच बघितलेल्या picture मधे मी लगेच heroineऎवजी मला imgine केलं, आणि Orchidsऎवजी बुचाच्या फुलांना. आणि जिवावर बेतत असूनही फुलं मिळवताना मला बघून जोरात हसायला सुरुवात केली. हि पोरगी कामातून गेली आहे हे दोघांना सुद्धा जाणवलं आणि तेपण मग माझ्या बरोबर हसायला लागले.


  असाच एकदा माझ्या खास ग्रुप बरोबर अलिबाग ला जायचा plan  ठरला. तिकडून येताना बिर्ला मंदिर बघण्यासाठी आम्ही सगळे थांबलो होतो. तिथे वर चढून गेल्यावर माझ्या नाकाने आणि मनाने बरोबर बुचाच्या फुलांचा वेध घेतला. कधी एकदा दर्शन घेऊन फुलं गोळा करायला पळतेय असं झालं होतं मला. आमच्यातला एक मित्र आदल्या दिवशी   night shift करुन आम्हाला trip मधे join झाला होता, त्यामुळे अर्थातच त्याने विश्रांतीसाठी गाडीतच झोपणे पंसत केले होते. दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. बुचाच झाडं बाजुच्या टेकडी वर जरा आतल्या बाजुस असल्याने मला त्याची फुलं काही मिळाली नाही. शेवटी फक्त तो सुगंध घेत खिन्न मनानं खाली आले. गाडीतला तो मित्र सोडला तर माझ्या उतरलेल्या चेहेरयाच कारण सगळ्यांना माहित होतं. चहा पिण्यासाठी उतरलेल्या त्यानी अखेर मला माझ्या गप्प रहाण्याच कारण विचारलं. मी लहान मुलानं सांगाव तस सांगितलं, "काका, तिथे बुचाच झाड आहे पण मला फुलं मिळाली नाहीत". बाकिच्यांसाठी तशी ही गोष्ट म्हणजे एकदमच normal, पण माझ्यासाठी ती जवळ जवळ माझ्या प्रेमाची हार होती. माझा पडलेला चेहेरा बघून शेवटी चहा घेण्य़ाआधी बिचारा  तो , "चल बघू तरी तुझं बुचाच झाड आणि त्याची फुलं कशी दिसतातं.." म्हणतं माझ्या बरोबर परत मंदिरात आला. पूर्वी मैत्रिणींनी केलेली थट्टा आठवली, "बुचाची फुलं म्हणजे काय हो बाई?" म्हणणारा तो राजकुमार पहिल्यांदा मला तिथेच योगेश मधे दिसला. यथावकाश त्या नंतर २-३ वर्षात खरोखरीच तो माझ्या जिवनातला राजकुमार झाला.  माझ्या पहिल्या प्रेमासकट त्यान हसत मला स्विकारलं होतं. त्याच्या-माझ्या नशिबाने त्याच्या घरासमोरील झाडांमध्ये १-२ नहि तर चक्क ४-५ बुचाची झाडं होती. माझ्या प्रेमाच प्रतिक म्हणून त्यानी द्यायच्या ऎवजी मीच खूप सारी बुचाची फुलं  त्याला दिली होती. गाडी वरुन जाता-जाता फुलांचा सडा दिसला कि मी त्याला थांबवायचे आणि मनसोक्त फुल गोळा करायचे. असच एकदा दसरयाचं shopping करुन येत असताना सडा बघून त्याला गाडी कडेला घ्यायला लावली. "मी १ मिनिटामध्ये २-३ फुलं घेउन येते" म्हणत मी फ़ुलं गोळा करायला सुरुवात केली. ती टप्पोरी फुलं गोळा करताना पूर्ण विसरुनच गेले  होते योगेश  मागे थांबला आहे.लक्षात येता क्षणी पटकन आहे ती फुलं घेऊन मी गाडीजवळ गेले. योगेश न खूप शांत चित्तान मला विचारलं, "कोणत्या शाळेत होतीस?" त्याच्या ह्या प्रश्णाला उत्तर देण्याआधीच परत एकदा गंभिर चेहरयाने , "गेले ५ मिनिटे. एका हातावर मोजता येणार नाही एवढी फुलं घेऊन तू आलिस न म्हणून विचारल कि १-२-३ अस काही शिकवल होतं कि नाही  शाळेत हे फक्त confirmकरत होतो.". त्याच हे वाक्य पूर्ण होण्याआधीच एक अलगद टपली मारुन त्याच्या मागे बसले होते. पण मग मनाशी ठरवलं, दुसरया प्रेमापुढे पहिल्या प्रेमाचा सतत चा उल्लेख किंवा अस्तित्व कमीतकमी आणायचं. त्याने दुसरा दुखावला जाऊ शकतो.  


   बुचाची फुलं गोळा करायचा माझा छंद अजूनही तसाच आहे. निवांत वेळ असला आणि रस्त्यात बुचाच झाड दिसलं कि गाडी थांबवायची. मनसोक्त फुलं गोळा करायची आणि मगच पुढे जायचं. बरं नुसती फुलं आणून ठेवायची नाहीत तर त्याचं संगोपन सुद्धा मला मनापासून करायला आवडतं. बोटा एवढा दांडा असलेली हि फुलं ठेवण्यासाठी एवढे छोटे flowerpot आता मिळतात. पण पूर्वी मात्र मला अश्या flowerpotची तहान Camera role च्या काळ्या रंगाच्या छोट्या डबी वर भागवायला लागायची. गोळा केलेली फ़ुलं मग अलगद धुवून त्या काळ्या डबीत मिठ-साखर पाणी घालून ठेवायची. रोज त्याचे देठ कात्रीनी कापायचे.  अर्थात फुल इतक नाजूक कि मोठ्या कात्रीपेक्षा छोटी कात्री वापरण चांगलं अस मनात म्हणत गुपचूप मग बाबांचं  Shaving Kit शोधल जायच. त्यांना काहिही न कळता काम फत्ते व्हायचं आणि kit जागेवर ठेवलं जायचं. ह्या फुलांच संगोपन मी अजूनही एवढ्याच प्रेमाने करते. फरक एवढाच कि आता योगेशच Shaving Kit काम फत्ते करून नीट ठेवल जातं.

      
 ह्या वेडाची कित्येक वर्ष सरली आणि माझी प्रतिक्षा अखेर फळास.. नाही नाही.. फुलास आली. मी लावलेल्या बुचाच्या झाडाला छोटी-छोटी फुलं आली. त्यातलच एक ट्प्पोर फुल जेव्हा खाली पडलं तेव्हा त्याला उचलून घेताना माझ्या मुलीला पहिल्यांदा हातात घेताना जेवढा आनंद झाला अगदी तेवढाच आनंद मला त्या क्षणी झाला. फरक एवढाच होता कि मुलीसाठी मला फक्त ९ महिने थांबाव लागल होतं पण त्या फुलासाठी मी ९ वर्ष आतुरतेने वाट बघत थांबले होते. हे फुल  मिळाल सुद्धा मला एकदम खास वेळी. योगेश पल्ल्याड जायच्या आधीच्या आमच्या खास भेटीच्या दिवशी. त्यामुळे त्या फुलाचा मानकरी अर्थातच योगेश बनला. त्या रात्री आमची ती भेट अजूनही सुगंधी आणि जास्त memorable करायचं काम माझ्या त्या फुलानं एकदम चोख बजावलं. 


 लहान मूल असू दे किंवा झाड, त्याच्याशी सतत बोलत राहिल पाहिजे त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते ह्या विचारांची आहे मी. त्यामुळे रस्त्यावर का असेना, काही खास बुचाच्या झाडांशी माझा संवाद हमखास चालू असतो. "अरे... कसा आहेस? कधी येणार तुझी फुलं? मी सुद्धा आतुरतेने वाट बघतेय त्यांची. Love You Dear & Take care" etc तर गप्पा नेहमीच्याच. आणि जर फुलांचा season सुरु झाला आणि मी जाता जाता  त्या झाडाला काही म्हणायच्या आत एखादं टप्पोर फुल खाली पडल तर मी सुद्धा अगदी मनापासून त्याला  "धन्यवाद !!!" म्हणायला विसरत नाही. जणू त्या झाडानं मला , "अग आलीस का? कशी आहेस? आली बर का माझी छोटी मुलं. तू वाट बघत होतीस नं त्यांची? हे घे त्यांच्यातलच एक गोड फुल." अश्या अविर्भावत एखाद फुल माझ्यासाठी खाली सोडलेलं असाव. अर्थात हयातले माझे संवाद आता माझ्या मुलीचे नक्कीच पाठ आहेत. वेगळ्या विचारात गाडी चालवत असेल आणि एखाद ओळखीचं झाड नजरेतून सुटल तर माझी हि वाक्य अगदी जशीच्या तशी ती सुद्धा म्हणते फक्त थोड्या बोबड्या बोलीत. ह्या झाडांच्या खालून जात असताना मात्र मी भयानक गाडी चालवते हे कबूल. कितिही speed असूदे. गाडी एकदम हळू करणार, तो सुगंध मनात आणि नाकात भरुन घेणार व मगच पुढे निघणार. आणि त्याच वेळी एखाद फुल गाडी खाली येवू नये म्हणून खूप पटकन गाडी उजवी किंवा-डावीकडे घेणार. अर्थात अश्या वेळी योग्य(?) त्या शाब्दिक पाहुणचाराचा सुद्धा आस्वाद(?) मला मिळालेला असतो हे सुद्न्यास सांगणे न लगे.  थोडक्यात काय :  "प्यार किया है निभाना तो पडेगा.". हं पण आता काहिंच्या मते "जित्याची खोड ती..... " असो.



       आता तर माझ्या मुलीला सुद्धा ह्या फुलांचा छंद जडलाय. माझ्यापेक्षासुद्धा आता तिला ह्या फुलांचा वास आधी येतो, आणि मग ओरडून सांगते, "आई, बुचाची फुलं". वेळात वेळ काढून मग आम्ही गाडी कडेला घेऊन मनसोक्त फुल वेचतो. दोन्ही मुठी फुलांनी भरल्या कि मगच गाडीकडे वळतो. एकटीने फुल गोळा करण्य़ापेक्षा तिच्या बरोबर फुल वेचताना फार वेगळ वाटत. नक्की शब्दात अस खरच नाही मांडता येणार पण फार भन्नाट, मस्त अस काहिसं तरी जाणवत. पण त्या क्षणी एकदा तरी तिच्या डोक्यावर हात ठेवून मनातल्या मनात मी त्या झाडाला नक्की सांगते, "हे माझं पिल्लु बर का रे. हिला आशिर्बाद दे". 



         सध्या जवळच एक italian resto उघडलय. शांत मोठा रस्ता, रात्रीची वेळ, गार वारा आणि तिथेच कडेला असलेल हे एक छोटस रेस्टो.  त्याची २-४ टेबलं मात्र बाहेर. त्यातल एक टेबल जरास खास. कारण एवढच - त्याच्या लगेच बाजूला असलेल छोटस बुचाच गच्च बहरेलं झाड. एकदम स्वप्नात बघितल्या सारख निवांत अनुभवण्यासाठीच ठिकाण. खरच एकदम "Perfect Romantic Destination" दोघांसाठी....... पण सध्या????...हरकत नाही... पुढच्या वर्षी नक्की. .


  माझ हे बुचाच वेड जाणणारे प्रत्येक जण मला आवर्जून हि फुलं देतात. ज्यांना भेटणं शक्य नसतं त्यांचे "तुझी आठवण आली" हे सांगणारे फोन, mails, messages ह्या season मधे येणार हे नक्की. कोणाच्या घरासमोर बुचाच झाड असत तर कोणाच्या office समोर. पण ती फुलं पाहून प्रत्येकाला त्यांच्या buzy schedule मधे माझी आठवण होते हि जाणिवच खूप सुखावह आहे. जगाचा निरोप घेताना गाठिशी हे प्रेम नक्की असेल बरोबर हे पक्क. हे माझ पहिलं-वहिलं प्रेमसुद्धा शेवटापर्यंत मला साथ देईन ह्याची खात्री आहे. म्हणूनच जर कधी chance मिळाला तर खरच यमदेवाला सुद्धा नक्की सांगेन, "यमराज, प्लिज जरा सप्टेंबर ते जानेवारी महिन्यांमधेच माझी फाईल open करा. तस काही खास नाही. तेवढच जाता जाता माझे जवळचे नातेवाईक- मित्र परिवार माझा पुढचा प्रवास सुगंधाने दरवळलेला असावा ह्याची मी न सांगता  काळजी घेतील. बाकी काही नाही". एक तुळशीची  माळ देवून शेवटचा निरोप देण्यापेक्षा एक टप्पोर बुचाच फुल देवून मला अलविदा करा. त्या क्षणी सुद्धा बुचाच्या सुगंधात आयुष्य संपल ह्यापेक्षा वेगळ सुख काही नसेल माझ्यासारख्या बुचवेडीला!!!


Wednesday, October 14, 2009

"काय कुठ पर्यंत आली तयारी? कधी जातोय नवरोबा तुमचा?", असा नवीन पण नेहमीचाच वाटणारा प्रश्ण मला विचारण्यात आला. मी सुदधा "अजून तरी काहीच नाही, अजून वेळ आहे त्याला जायला.", असं मोघम उत्तर देऊन तिथून पलायन केलं. ह्याच उत्तर माहित असूनही माझ मन मात्र त्या बद्दल विचार करण मुद्दाम टाळत होत.. प्रश्णाचे उत्तरच माझ्या डोळ्यात पाणी आणणारे होते. एका वर्षासाठी तो तिकड पैलतीरी आणी मी इकडे. वेळ मात्र आता हातातून निसटून जात होती. आणि म्हणता म्हणता त्याच जाणं अवघ्या ३ महिन्यांवर आलं.

योगेश ची एका top Univeristy मध्ये admission होऊन Visa Stamping सुद्धा झाल होत. Air Ticket सुद्धा ready होत. आणि आता खरी गरज होती ती सामानाच्या जुळवा-जुळवीची. Bag packing ची. मग मात्र मी पुढे सरसावले."Google जिंदाबाद" म्हणत वेग-वेगळ्या baggage packing च्या List गोळा केल्या. अगदी त्या मधे trekers ची नेहमीची list suddhA होती आणि केसरी International tours वाले देतात ती list सुद्धा होती. मग एक दिवस निवांत बसून एक "Master List" करण्यात अखेर आम्हाला यश आलं. पण एवढ्यावरच न थांबता ती list खरचं पुरेशी आहे की अजून काही हवं आहे? हे सुद्धा crosscheck करायला आम्ही विसरलो नाही. 1-2 जणांकडून त्या list तपासून घेतल्या. अर्थात काहींनी त्यात अजून गोष्टींची addition केली तर काहिंनी , "अगं, काय कायमचं पाठवत आहेस की काय त्याला" असे शेरे सुद्धा दिले. पण मला जेवढी जमेल तेवढी खबरदारी घ्यायची होत्ती. त्याला तिथे जाऊन किमान १-२ weeks तरी बाहेर पडून shopping कराव लागू नये हिच त्या मागची साधी भावना होती. अखेर "No-Need-to-Touch" अशी fullproof list तयार झाली. आता खरेदीचा श्री-गणेशा करणार तोच पुण्यामधे एका पाहुण्याचे आगमन झाले.

"Swine-Flue".. ज्या पद्धतीने swine flue पुण्यात आणि उभ्या महाराष्ट्रात पसरला, त्याची जणू दहशदच निर्माण झाली. त्यामुळे आपोआपच सगळं shopping बारगळलंAlmost पुणं जणू बंदच होता त्या एका week मधे. आता योगेश सुद्धा job मधून relieve झाल्यामुळे निवांत होता.बंद चा फायदा घेत मग आम्ही आमच्या गावाकडच्या गाठी-भेटी उरकल्या.. देवदर्शन घेऊन परत पुण्यात आलो. पण तरीही वातावरण तंग होते. त्यातच मग लाडके गणपतीबाप्पा आले. जरा का होईना पण सगळी कडे उत्साह निर्माण झाला. पण तरिही गर्दीत मिसळणे "risky" असल्याने shopping करायचा मुद्दाच बाजूला पडला. मात्र ते १0 दिवस घरामध्ये एकदम मस्त गेले. एकत्र असण्याचे जणू एक एक क्षण आम्ही साठवत होतो मनात.
Swine flue कमी झाला नसला तरी पुणेकर आता त्याला सरावले आणि हळू-हळू सगळीकडे normal गर्दी होऊ लागली. पण त्या नादात पित्रु-पंधरवडा सुरु झाला. काही "Hi Commands" नी शक्यतॊ ह्या दिवसात shopping टाळा असा सल्ला दिला. पण आता थांबणे खरच शक्य नव्हते. "जय श्रीराम" म्हणत आम्ही उत्साहात Shopping सुरु केल

ह्या सगळ्या उशीरामुळे बरेच "Sale(?)" केव्हाच संपले होते. आता आहे त्या किंमतींमध्ये गोष्टी खरेदी करायला सुरुवात झाली. तरी त्यातल्या त्यात "रविवार पेठ" लांब वाकडला जाऊन मनासारखे shopping केले. पण असंख्य शेपटं मात्र उरली होती. एक jeans, Long Tshirt घ्यायचा राहिला होता. तर एक alarm clock राहिल होत. camera सुद्धा आणायचा होता. त्यामुळे shopping list काही केल्या पूर्ण संपत नव्हती.

हळू हळू महिने संपून जायचा दिवस काही weeks वर आला. नेहमी office मधे असणारा "यो-बाबा" आता पुर्ण वेळ घरी मिळाल्यामुळे आमचं पिल्लु सुद्धा खूष होतं. सकाळी दात घासायला बाबा, अंघोळ घालायला बाबा, आणि शाळेत सोडायला-आणायला सुद्धा बाबाच. तिच आणि बाबाच जणू मस्त दोघांचचं अस नव विश्वच तयार झालं होतं. माझी parallel धावपळ चालूच होती. सकाळी त्याच्या बरोबरची Bank किंवा तत्सम कामं, मग माझं Office आणि evening ला उरली-सुरली shopping. ह्या सगळ्यात आम्हा दोघांना निवांत असे क्षण काही केल्या मिळतचं नव्हते. ही बोच आम्हा दोघांनाही होती.

योगेश तसा strong पण मी मात्र खूप हळवी. तो जाणार हा विचार सुद्धा आला तरी डोळ्यात यमुना-गंगा उंचावरून खाली पडण्यासाठी सरसावून बसायच्या. कधी-कधी धबधबे सुद्धा वाहिले. पण सांगायचे तरी कोणाला? काही मित्र-मैत्रिणींनी "आत्तापासूनच रडायची practice कर म्हणजे त्या दिवशी खर वाटेल", अशी थट्टा पण केली. त्याचं जाणं final होत. Goal set होता. पण माझं मन मात्र ते accept करायला तयार नव्हतं. एक दिवस जरी तो दिसला नाही तरी अस्वस्थ होणारी मी एक वर्ष कशी काढणार हा मोठा प्रश्नच होता समोर. पण मन खंबिर करणे आवश्यक होते. मनाला वेळोवेळी समजावत होते, तू इथे तुझ्या सगळ्यांमधे रहाणार आहेस, तो तर तिकडे एकटा आहे. मग तूच अशी हळवी झालीस तर त्याच्या मागे खंबिरपणे कोण उभे रहाणार? सगळे कळत होते पण ....

आता जायचा दिवस weeks वरुन हातावर मोजता येइन इतका जवळ आला. अत्यंत खटाटोपीनं फ़क्त दोघांची अशी date सुद्धा आम्ही manage केली. मनसोक्त गप्पा, Candle light Dinner, romantic Songs अशी एकंदरीत मस्त तयारी होती. पण त्या वेळात आम्ही बोलण्यापेक्षा माझे डोळेच बोलले. कित्येक दिवसांपासून दडवलेलं माझं दु:ख त्याच्या मिठीत घळाघळा वाहिल. रात्री झोपताना डोळे आधी बंद झाले कि डोळ्यातलं पाणी हे मात्र कळायच्या आत झोप लागली होती. दुसरया दिवसापासून मन जरा हलकं झाल्यानं जास्त जोमान shopping सुरु झालं.

तो सगळा आठवडा योगेश साहेबांच्या "केळवणांचा" होता. "अरे जायच्या आधी येऊन जा एकदा" , असे मोठ्यांच्य़ा छोट्या requests-cum-orders ला टाळणं शक्यच नव्हतं. मग रोज evening ला एका घरी किंवा एका हॊटेल मधे रात्रीची जेवणे सुरु झाली. एकाच होटेल मधे तर दोनदा गेल्यामुळे तिथल्या लोकांनी सुद्धा आमच हसून स्वागत केलं.

आता माझी रजा सुरु झाली होती, तातडीने packing संपवणे आता गरजेचे होते. शेवटी मनाचा ठिय्या करून bag pack करायचे ठरवले. आत्तापर्यंत वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे असे किमान ३-४ वजनकाटे घरात आधीच स्थानापन्न झाले होते. एक normal kg मधे weight दाखवणारा होता तर एक pounds मधे weight दाखवणारा (म्हणजे शेजारी calculator घेऊन बसवणारा). तर एक हातात bag उचलून मगच weight check करायला लागणारा. एक न दोन. होत सगळं पण त्याच्या वापर मात्र सुरु झाला नव्हता. पण अखेर सुरुवात झाली. आधी individual सामानाचे वजन करुन addition केली गेली. मग नुसत्त्या रिकाम्या bag च सुद्धा वजन करुन त्यात add करुन दिलेल्या limit मध्ये bag आहे का हे बघण सुरु झालं. तरी बर त्याला 50kg allowed होते. २-३ गोष्टी मी bag मध्ये ठेवायच्या आणि योगेश नी, "ह्याची काय गरज आहे?" अस म्हणून काढून टाकायच्या, हे तर ठरलचं होत. त्यावरुन होतात ती typical भांडण सुद्धा तो जायच्या घाईगडबडीत आम्ही करून घेतली. प्रेमाचे २-४ क्षण लक्षात ठेवून पुढील वर्ष एकदमच बुळबुळीत जाउ नये ह्याची काळजी आमची ही छोटी भांडण घेत होती. जायचा दिवस आता अगदी २ दिवसांवर आला तरी bag काही केल्या पुर्णपणे भरली गेली नव्हती. शेवटी एक मोठ्ठ पण प्रेमळ भांडण होत अखेर bag भरली गेली. असंख्य मसाले, MTR ready to cook packs, maggi, उपीट मिक्स , खिचडी मिक्स असे एक न दोन करत bags भरल्या होत्या. आईच्या आग्रहाच्या गुळाच्या पोळ्या, माझ्या खव्याच्या पोळ्या, शंकरपाळ्या ह्यांनी आपापली जागा bag मध्ये पटकावली होती. कोणत्या bag मध्ये काय आहे ह्याची माझी list तयार होती तर airport वर weight जास्त झालं तर काय काय काढून टाकायचं ह्याची list योगेश ची अगदी तॊंडपाठ होती. २५ किलो च्या पुढे वजन असल्यामुळे एकदा रद्दीवाल्याकडे जावून तर एकदा भाजीवाल्याकडे असे दोनदा मोठ्या काट्यांवर वजनं झाली. आणि अखेर 52 kg अशी बेरीज समोर आली. लवकर checkin केलं कि २-४ किलो पुढे-मागे adjust करतात ह्या गोष्टीची पुष्टी देत मी अजून काही सामान bag मध्ये टाकून दिले.

आता हातात फ़क्त एक रात्र उरली होती. दिवसभराची धावपळ झाली असूनही आम्हा तिघांच्या गप्पांत रात्र कधी संपली कळलचं नाही.आणि अखेर तो दिवस उजाडला. सिमोलंघनाचाच दिवस तो. इथे फ़क्त पुण्याचीच नाही तर भारताची सिमा ऒलांडून जाणार होता तो. दसरयाचे जेवण छान गप्पा मारत उरकले. पण जस-जसे ४ वाजायला लागले, माझ्या पोटात गोळा यायला लागला. आई-बाबांना सोडून येताना सुदधा एवढी धाकधूक वाटली नव्हती त्याहूनही जास्त भिती मनात दाटली होती. रडून चालणार नव्हतं. पण तरिही एखादा अश्रू सगळे बांध फ़ोडत टपकन गालांवर येत होता. Final bag packing, त्याच्यावर नावाचे tags pasting करुन सगळ तयार होतं. देवीला जावून आलेल्या योगेश ला मी औक्षण केल, पण त्याच्या नजरेल नजर न मिळवतं. नजरा-नजर टाळणेच योग्य होत माझ्यासाठी तेव्हा. छानशी greetings देवून आम्ही त्याला हसत शुभेच्छा दिल्या. आमच्या पिल्लुने तर बाबा साठी एक greeting तयार केले होते. आकाशात उडणारे विमान, पक्षी अस बरच काही होतं त्यावर. आत मध्ये "Love u baba, miss u" etc message माझ्याकडून लिहून घेतला होता. उशिर होत होता. निघणे गरजेचे होते. पण.. काही केल्या पाय निघत नव्हता. वेळ इथेच थांबावी अस काहीच वाटत होत. हसत त्याला wish करत, बाबा साखी sack घेऊन तयार झालेल्या पिटुकली सोबत अखेर घर सोडलं.

आणि ज्याचा विचार सुद्धा टाळणारी मी, ती घडी माझ्या समोर येउन उभी राहिली. तो अखेर चा क्षण.. दुराव्या आधीचा. आता चेहेरा रड्वेला दिसला तर तो दुखावेल. कसतरी control करत होते... खोटं खोटं हसत होते... एकमेकांकडे बघणं सुद्धा टाळत होतो.... माझीच ही व्यथा नव्हती. छोट्या आर्याला सुद्धा बाबाकडे बघण जड जात होते. शेवटी तिचा चेहेरा हातात धरुन सुद्धा ती त्याच्या कडे बघेना. बाबा लांब जातोय हे तिला नीट माहित होतं पण त्याच्याबरोबर ती पण जाणार ह्या वेड्या समजूतीमध्ये ती गुंग होती. पण इथे फ़क्त बाबाच जातोय हे कळलं होतं आता. शेवटी पटकन तिला माझ्या कडेवर घेउन म्हणले, शोना बाबाला सांग न काळजी घे म्हणून तर हिनी सुरुवातच केली, "बाबा नीट अभ्यास कर... इकडे तिकडे बघू नकोस. Best of luck...... " आणि थोड थांबून "मोठा होऊन लवकर परत ये".......... आमच्या अडीच वर्षाच्या मुलीचे हे शब्द ऎकून आम्ही हदरलो. लहान लहान म्हणून consider न करणारया तिच्या मनात सुद्धा एवढे विचार चालू असतील हे कळल्यावर पुढच्या वर्षात तिची किती काळजी घ्यावी लागेल हे कटाक्षाने जाणवलं.

अखेर तो क्षण आला. ती एक मिठी... हळूच गिळलेला तो अवंढा.....पण त्याच्या कडे बघत अश्रू लपवत दिलेला गरम हातांचा एक last shakehand आणि हसत म्हणलेला Best luck..........त्याला गेट पर्यंत सोडून मागे फ़िरले. डोळ्यात पाणी होते, पण ते पुसत लगेच Waiting Room गाठली. योगेश Checkin करुन तिथे परत भेटायला येणार होता. अजून संयम सुटून चालणार नव्हता. थोड्याच वेळात Trolley घेऊन आम्हाला शोधत आला. क्षणाचा दुरावा आणि लगेच भेट हे भाग्य मात्र ह्या वेळेपुरतच होत. सगळ्यांशी हसून गप्पा झाल्या. आर्यान तर स्वत:च्या हातन एक एक जेली स्वीट भरवल त्याला. मगाशी त्याच्याकडे बघण ही टाळणारी आता त्याला कड्कडून भेटली. तिला सुद्धा बाबा परत आला असच वाटलं. एक एक जण मग बाजूला होत गेले.. आता फक्त मी योगेश आणि आर्या. २ मिनिट फ़क्त शांतता. पण मनापासून हसत हसत त्याला All the Best wish केल. मनावर ओझ ठेवून Goodbye म्हणल. त्याला पाठमोर बघून गर्रकन मागे फ़िरले. आता पर्यंत दाटलेला - कोंडलेला सागर क्षणात कोसळला. पण आर्याच्या एका प्रश्णाने एकदम भानावर आले."आई तू का रडतीयेस गं?". मग जाणवलं, बाबा नाहीये म्हणून तिने दु:खी व्हायला नको. तिला पुढच्या वर्षात बाबाची कमतरता जाणून द्यायची नाहीये. पुढच्या पूर्ण वर्षासाठी तिचा बाबा मीच आहे. तिनेच मग तिच्या रुमालाने माझे डोळे पुसले आणि आम्ही परत यायला निघालो.

उचंबळून आलेल्या मनाला शांत करण्या शिवाय पर्याय नव्हता... रडून चालणार नव्हते कारण आर्याचा बाबा मनातल कितीही मोठ्ठ दु:ख रडून कधीच व्यक्त करत नसतो हे त्याच्या डोळ्यात जाणवलं होतं. .....