Friday, August 2, 2013

सुगंध.....

परवाच एका रविवारी नेहमीचा Shampoo नाही हे लक्षात आल्यावर खालून Shampoo आणला. खूप दिवसांनी नकळत तोच जुना "Clinic Plus" घेतला गेला आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. आठवणी काय आख्खा भूतकाळच जणू Bathroom मधे Rewind झाला.

   तो रविवार खरच फारच खास असायचा. त्याची चाहुल लागायची तीच मुळी "साप्ताहिकी" नी. रविवारी दुपारच्या छायागीता मध्ये कोणत गाण लागणार ? संध्य़ाकाळी कोणता "चित्रपट" असणार? अशी असंख्य गुपीतं हि साप्ताहिकी अलगद उलगडायची. मग त्याप्रमाणे आपोआपच बेत ठरले किंवा बदलले जायचे. त्याच्या planning मध्येच मग तो सोनेरी दिवस उगवायचा. काय़ थाट असायचा खरच त्याचा काय सांगू!!!

      सोमवार-ते शनिवार लवकर उठो-न-उठो, पण रविवारी मात्र सकाळी ७ ला "रंगोली" च "title song" ऎकताच डोळे खाडकन उघडले जायचे आणि "तडमडत" का होईना TV लावला जायचा... बास... तेव्हापासून खरा रविवार सुरु व्हायचा. मग चहा , नाष्टा मग परत चहा अस होई पर्यंत महाभारत/चंद्रकांता अस बरच काही संपलेल असायचं. पण अंगातला आळस मात्र अगदी अगदी तसाच असायचा. आई च्या मूड वरून मग अंघोळीच timing ठरायचं. नाही म्हणजे मूड एकदम छान असला कि निवांत जेवण करुन अंघोळ केली तरी चालायचं. पण फारसं ते सूख नाही पडल पदरात sorry ओढणीत. पण तरीही थंडीतली जेवण झाल्यावरची दुपारची अंघोळ म्हणजे एकदातरी अनुभवावी अशीच. अस मस्त निवांत नाहून झाल्यावर बाल्कनी मधे सकाळ उघडून बसायच. बाजूला "जुन्या पेपर" वर हिरव्यागार हरबरयाची गडडी आणि गप्पा. कितीही पोट भरलं असू दे ह्या कोवळ्या हरबरयासाठी पोटात आपोआप जागा असायचीच. 

 रविवारच जेवण सुदधा असच एकदम खास असायच. त्यात आमच्याकडे तर आईच्या हातची आळूची भाजी , वरण-भात, मसालेभात तर ठरलेलाच. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भजी, पापड सुद्धा असायचे. खर तर साधच पण पूर्णांन खाल्याच समाधान फारच वेगळ असायच त्यावेळी.

अखेर साप्ताहिकीत दाखवलेलं ते गाण छायागीतामधे अगदी शेवटी लागायच आणि मग ते बघत तिथेच मस्त आडव पडल जायचं. कधी कधी जेवण लांबली कि त्या मुक-बधिरांच्या बातम्या सुद्धा बघितल्या जायच्या त्याही मन लावून.

   सांगायच काय तर केवळ एका शाम्पू च्या वासानं मन भूतकाळात सहज गेलं आणि रमल सुद्धा...  खरच काही ठरावीक सुगंध आपल्या मनात नेहमी आत कुठेतरी दडून बसलेले असतात. तो सुगंध आला कि आठवणींची मालिका लगेच प्रसारित व्हायला सुरुवातच.

      पूर्वी शाळेत दुसरीला कोणाएकीच्या वाढदिवसाला  sainted खोडरबर मिळालेल .. जपून ठेवलेलं ते खोडरबर .. त्याचा सुवास अजून सुद्धा नाकात पक्का आहे. आता कधी तसा सुवास आला कि आपोआप मन शाळेच्या दिवसात रमत. 

नवीन पुस्तकांचा सुवास.. वाफाळत्या कॉफी चा वास... आईच्या हातच्या वरण भाताचा सुवास.. college मध्ये नेहमी वापरलेल्या moisturizer चा सुवास . पहिल्या पावसाचा सुवास . बुचाच्या फुलाचा सुवास .. आपल्या माणसाच्या perfume चा सुवास... प्रत्येक सुगंध हा कुठे तरी मनाशी निगडीत झालेला.... असे अनेक सुगंध आले कि मन तिकडे घुटमळणारच .. ह्यात वाद नाही ....
 

            एकंदरीत काय तर धकाधकीच्या आयुष्यात तेवढाच आपला विरंगुळा.....